केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मिशनमुळे देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ही योजना लागू झाल्यामुळे देशात कमीत कमी १० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. १० कोटी गरिब परिवारांना आरोग्य सुरक्षा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी पाच लाखांचे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ‘आयुष्मान मित्र’ या पदांतर्गत भरती करण्यात येणार आहे. जवळपास १ लाख आयुष्मान मित्रांची नेमणूक केली जाणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे आयुष्मान मित्र आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात माहिती देतील.

या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार करण्यात आला आहे. आता सर्व नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांना मदत कऱण्यासाठी या आयुष्मान मित्रांची नेमणूक होईल. हे नव्याने भरण्यात आलेले लोक लाभार्थी आणि रुग्णालय यांच्यात समन्वयाची भूमिका बजावतील. प्रत्येक रुग्णालयांमध्ये याचा एक वेगळा डेस्क असेल. ज्याठिकाणी रुग्णांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम होईल. एकूण एक लाख आयुष्मान मित्रांची नोंदणी केली जाणार असली तरीही आता त्यातील १० हजार पदे भरली जातील.

ही आरोग्य योजना मोदी केयर म्हणूनही ओळखली जाते. येत्या १५ ऑगस्टपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. सुरुवातीला छत्तीसगडमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार असून त्यानंतर इतर राज्यांमध्ये योजना लागू होईल. राज्य आणि केंद्र अशा दोन्हींकडून योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा राबविली जाणार आहे. यात रुग्णांना ५० हजारांचा आरोग्य विमा आणि ५ लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे.