देशातील करोना रुग्णांच्या प्रतिदिन वाढीचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी नऊ  हजारांहून अधिक नोंदवला गेला. गेल्या चोवीस तासांमध्ये सुमारे १० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात ९,८५१ तर, बुधवारी ९,३०४ रुग्णांची भर पडली. ३१ मेपासून ३ जूनपर्यंत करोनाच्या रुग्णांमध्ये प्रतिदिन ८ हजारांहून अधिक वाढ झाली होती.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून देशभरात एकूण रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार ६६२ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ५,३५५ रुग्ण बरे झाले. एकूण मृत्यू ६,३४८ झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये २७३ मृत्यू झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

गेल्या चोवीस तासांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत १३०० नव्या रुग्णांची भर पडली. २५ हजार रुग्णसंख्या असलेले महाराष्ट्र (७७ हजार ७९३) आणि तमिळनाडूनंतर (२७ हजार २५६) दिल्ली (२५ हजार ४) हे तिसरे राज्य आहे.

राज्यात २४ तासांत २४३६ रुग्णांची नोंद

राज्यात आज करोनाच्या २४३६ नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात एकूण ८०,२२९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. आज १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८४९ जणांचे बळी गेले आहेत. सध्या राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे.

चार दिवसांत ९०० मृत्यू

करोनाबाधितांचे पहिले एक हजार मृत्यू ४८ दिवसांत झाले, पण गेल्या चार दिवसांमध्ये एक हजार मृत्यू झाले आहेत. १ ते ४ जून या काळात मृत्यूची संख्या ५१६४ वरून ६०७५ झाली. १२ मार्च रोजी पहिला करोना रुग्ण मृत्यू झाला. त्यानंतर ४८ दिवसांनी म्हणजे २९ एप्रिल रोजी एक हजार मृत्यू नोंदवले गेले. नंतर मात्र प्रत्येक एक हजार मृत्यूसाठी ११, ८, ७, ६ आणि ४ दिवस लागले. पुढील प्रत्येक हजार मृत्यूच्या टप्प्यासाठी कमी दिवस लागले.