‘पाहताक्षणी प्रेमात पडणे’ ही म्हण जरी खरी असली तरीही प्रेमविवाह ही त्याच्या बरीच पुढची पायरी झाली. त्यातही पालकांच्या विरोधात जाऊन अशाप्रकारे लग्न करणे हा अनेक तरुण-तरुणींपुढील एक मोठा प्रश्न झाला आहे. त्यामुळे कुटुंबात होणारे वाद आणि एकूणच समाजात त्याचे उठणारे पडसाद लक्षात घेऊन तरुणांनी त्यावर एक उपाय शोधला आहे. अशाप्रकारे पालकांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करणार नाही अशी शपथ गुजरातमधील १० हजार तरुण-तरुणी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने घेणार आहेत. आपल्या पालकांनी लग्लाना परवानगी न दिल्यास आपण हे नाते तोडण्यास तयार आहोत असेही या तरुणांनी म्हटले आहे.

लाफ्टर थेरपिस्ट कमलेश मसालावाला यांच्या ‘हास्यमेव जयते’ या संस्थेतर्फे एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सुरतमधील १२ शाळांतील मुले आणि मुली यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. आपल्या पालकांनी विरोध केल्यास आपण प्रेमविवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा ही मुले घेणार आहेत. याबाबत मसालावाला म्हणाले, सध्या अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. यामध्ये अनेक जण कुटुंबियांचा विरोध असल्याने घरातून पळून जाऊनही लग्न करतात. पण आम्हाला पालकांचे महत्त्व समजावून द्यायचे असल्याने तसेच लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असल्याचे आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले असे मसालावाला म्हणाले. येत्या काळात अशाप्रकारचा शपथ घेण्याचा कार्यक्रम आणखी शाळा, महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.