उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १०४ सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पत्र लिहून ‘लव्ह जिहाद’ कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील पोलिसांना जनतेच्या हक्कांसंदर्भात तसंच लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा राज्यघटनेचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनाही सल्ला देण्यात आला आहे.  उत्तर प्रदेशात नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ कायद्यामध्ये बळजबरीने धर्मांतर केल्यास कारागृहात पाठवण्याची तसंच दंडाची तरतूद आहे.

अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात मोराबादमध्ये अटक करण्यात आलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. हिंदू तरुणीशी विवाह केल्यामुळे मोरादाबादमध्ये दोन मुस्लीमधर्मीय भावांना पोलिसांनी अटक केली होती. यादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला. पत्रामध्ये तरुणीने आपल्या आपल्या संमतीने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं असतानाही बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ असा आरोप केल्याचा उल्लेख आहे.

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले…

“जन्माला येण्याआधीच एका निर्दोष बालकाची झालेली ही हत्या नाही का? तुमच्या राज्यातील पोलीस यासाठी जबाबदार नाहीत का?,” अशी विचारणा अधिकाऱ्यांनी पत्रातून केली आहे. “इतकंच नाही तर उत्तर प्रदेश पोलिसांना अजिबात वेळ न दवडता लोकांच्या हक्कांची माहिती देणारं प्रशिक्षण दिलं पाहिजे. तुमच्यासहित उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांनाही हे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आपण आणि इतर लोकप्रतिनिधींना शपथ घेतलेल्या घटनेतील तरतुदींविषयी स्वतःला पुन्हा एकदा शिक्षित करण्याची आवश्यकता आहे,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी सुनावलं आहे.

हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील अश्लील सेक्स स्टोरीजमुळे नवा वाद; अ‍ॅमेझॉन पुन्हा वादात

पत्रात पुढे सांगण्यात आलं आहे की, “या पत्रामुळे जनमत एकत्र करण्यास आपल्याला मदत होईल तसंच न्यायालय मध्यस्थी करुन हे अनुचित प्रकार थांबतील अशी आम्हाला आशा आहे”. लव्ह जिहाद कायदा तयार करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेश पोलीस रोज एका व्यक्तीला अटक करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे. याशिवाय एक डझनहून अधिक एफआयआर दाखल आहेत. कायद्यात १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.