जवळपास सहा महिन्यांपूर्वी आसामच्या सिलचरमधील डिटेंशन कॅम्पमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय चंद्रहार दास यांनी मोबाइल फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण पाहिल्यानंतर भविष्यात सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे भाषण सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी (CAA) होतं, ज्यामध्ये त्यांनी कोणाचंही नागरिकत्व जाणार नाही तसंच कोणालाही देशाबाहेर जावं लागणार नाही असं आश्वासन दिलं होतं. व्हिडीओ पाहिल्यानंतर चंद्रहार दास यांनी आपली मुलगी नियुती दासला म्हटलं होतं की, “मोदी आमार भोगोवन (मोदी माझा देव आहे)…ते सर्व काही ठीक करतील. नागरिकत्व कायद्यामुळे आपण सगळे भारतीय होणार”.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रहार यांचं नाव राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) आलं नव्हतं तेव्हा त्यांना परदेशी नागरिक म्हणत डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं. चंद्रहार दास जवळपास तीन महिने तिथे होते. यानंतर त्यांची सुटका करत महत्वाची कागदपत्रं जमा करण्यास सांगण्यात आलं ज्यामुळे त्यांचं नागरिकत्व सिद्ध होईल. रविवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सिलचरपासून ३० किमी दूर हिंदू बंगाली बहूल बराक खोऱ्यातील घऱात १०४ वर्षीय चंद्रहार दास यांचं रविवारी निधन झालं. घरातच त्यांचं निधन झालं. त्यांची मुलगी नियुती दासने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे की, “जेव्हा कधी ते आशा व्यक्त करायचे तेव्हा आपल्याला दुख: व्हायचं. घरात, गल्लीत आणि रस्त्यावर नरेंद्र मोदींचे पोस्टर लागले आहेत. जिथे कुठे ते पोस्टर दिसतील मी हात जोडते, कारण माझे वडील त्यांना देव मानायचे. देव जो सर्व काही ठीक करतो. नागरिकत्व कायदा येऊन एक वर्ष झालं आहे, पण देवाने काय केलं आहे?”.
नागरिकत्व कायद्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. नव्या नागरिकत्व कायद्याला ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आलं. १० जानेवारी २०२० रोजी कायद्याची अमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण हे अद्यापही झालेलं नाही.
“माझ्या वडिलांची भारतीय म्हणून मृत्यू व्हावा अशी इच्छा होती. मृत्यूआधी परदेशी नागरिक असल्याचा ठपका हटवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. आम्ही न्यायालयातही गेलो, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो, सर्व कागदपत्रं जमा केली होती. पण काहीच झालं नाही, काहीच नाही. आम्ही अद्यापही कायद्याच्या नजरेत परदेशी नागरिक आहोत. सुधारित नागरिक्त कायद्याने आमच्यासाठी काही केलं नाही. हा कायदा आमच्यासाठी काहीच फायद्याचा नाही,” असं नियुती दास हतबल होऊन सांगतात.
मोदी सरकारने वारंवार सीएए चंद्रहार दास यांच्यासारख्या लोकांसाठी असल्यावर जोर दिला आहे. दुसरीकडे या कायद्याला बराक खोऱ्यात कायद्याला मोठं समर्थन तर आहे, पण त्याचा प्रभाव दिसत नाही. आसाममधील इतर भागांमध्ये याचा विरोध केला जात आहे. बाहेरच्या लोकांना नागरिकत्व देणं राज्यासाठी धोक्याचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
डिटेंशन कॅम्पबद्दल बोलताना चंद्रहार यांचा मुलगा गौरंगो सांगतो की, “मार्च २०१८ मध्ये काही अधिकारी घरी आले होते. त्यांनी बराच वेळ माझ्या वडिलांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांना सिलचर जिल्हा जेलमध्ये परदेशा नागरिकांसोबत डिटेंशन कॅम्पमध्ये टाकण्यात आलं. आम्हाला अनेक नोटीसा आल्या होत्या. पण त्यावर सुनावणी झाली नाही. माझे वडील वयस्कर आणि आजारी होते, पण तरीही डिटेंशन कॅम्पमध्ये त्यांनी वाईट अवस्थेत ठेवण्यात आलं”. दुसरीकडे दास कुटुंबाचं प्रकरण अद्यापही न्यायालयप्रविष्ट आहे. दास यांच्या मुलं अजूनही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लढा देत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 10:23 am