देशभरातील करोनाबळींची संख्या सोमवारी १०९ वर पोहचली असून, करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४०६७ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोविड-१९च्या सक्रिय प्रकरणांची संख्या ३ हजार ६६६ असून, २९१ लोक बरे झाल्याने त्यांनी सुटी देण्यात आली, तर एकाने स्थलांतर केले. एकूण लोकांमध्ये ६५ परदेशी नागरिक आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

तथापि, पीटीआयला रविवारी राज्यांकडून थेट मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात करोनाच्या संसर्गामुळे किमान १२६ जण मृत्यूमुखी पडले असून, संसर्ग झालेल्यांची निश्चित प्रकरणे ४१११ वर गेली आहेत. यापैकी ३१५ जण बरे होऊन त्यांना सुटी मिळाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २१ नव्या बळींची, आंध्रप्रदेश व तमिळनाडूत प्रत्येकी २ आणि पंजाबमध्ये एका नव्या बळीची नोंद झाली.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ४५ करोनामृत्यू झाले असून त्याखालोखाल गुजरातमध्ये ११, मध्यप्रदेशात ९, तेलंगण व दिल्लीत प्रत्येकी ७, पंजाबमध्ये ६, तर तमिळनाडूत ५ जण मरण पावले आहेत. कर्नाटकमध्ये ४, पश्चिम बंगाल व आंध्रप्रदेशात प्रत्येकी ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. जम्मू व काश्मीर, उत्तरप्रदेश व केरळमध्ये प्रत्येकी २, तर बिहार, हिमाचल प्रदेश व हरियाणात प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे.

करोनाचा निश्चित संसर्ग झालेल्यांची सर्वाधिक, म्हणजे ६९० इतकी संख्या महाराष्ट्रातील असून, तमिळनाडूत असे ५७१, तर दिल्लीत ५०३ लोक आहेत. तेलंगणमधील करोनाबाधितांची संख्या ३२१ पर्यंत, केरळमधील ३१४ पर्यंत आणि राजस्थानातील २५३ पर्यंत वाढली आहे.

उत्तरप्रदेशात करोना संसर्गाची २२७, आंध्रप्रदेशात २२६, मध्यप्रदेशात १६५, कर्नाटकात १५१ आणि गुजरातमध्ये १२२ प्रकरणे आहेत. इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील संख्या अशी : जम्मू- काश्मीर (१०६), हरियाणा (८४), पश्चिम बंगाल (८०), पंजाब (६८), बिहार (३०), आसाम व उत्तराखंड (प्रत्येकी २६), ओडिशा (२१), चंदीगड (१८), लडाख (१४), हिमाचल प्रदेश (१३), अंदमान- निकोबार (१०), छत्तीसगड (९), गोवा (७)आणि पुदुच्चेरी (५) झारखंड व मणिपूरमध्ये करोनाचे प्रत्येकी २, तर मिझोराम व अरुणाचल प्रदेशात  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

चौदा महिन्यांच्या मुलाला संसर्ग

* गुजरातमधील जामनगर जिल्ह्य़ात १४ महिन्यांच्या मुलाला करोनाचा संसर्ग झाला असून त्याचा परदेश किंवा आंतरराज्य प्रवासाशी कुठलाही संबंध नसताना त्याला लागण झाली आहे.

* या मुलाला करोनाची लागण कशी झाली याचा आरोग्य अधिकारी शोध घेत आहेत.  रविवारी या मुलाची चाचणी सकारात्मक आली असून त्याला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

* दारेद या खेडय़ात मजूर वस्तीत तो आईवडिलांसमवेत राहत होता. आता ही वस्ती ‘सील’ करण्यात आली आहे.

* जामनगर जिल्ह्य़ातील हा पहिला रुग्ण असून आरोग्य प्रशासनाने या मुलाचा करोना स्रोत शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.