छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले. तर आणखी काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  सध्या नक्षलवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचेही वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चकमकीत आतापर्यंत पाच नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीत जखमी झालेले सीआरपीएफचे कॉन्स्टेबल शेर मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी सुरुवातीला गावकऱ्यांना आमचे नेमके ठिकाण जाणून घेण्यासाठी पुढे पाठवले होते. त्यानंतर आमच्यावर तब्बल ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. आम्ही केवळ १५० जण होतो. तरीदेखील आम्ही न डगमगता त्यांच्यावर गोळीबार सुरू ठेवला. आम्ही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. मी स्वत: तीन ते चार दहशतवाद्यांच्या छातीत गोळ्या घातल्याचे शेर मोहम्मद यांनी यांनी सांगितले. यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात ७६ जवान मारले गेले होते. हा भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात भीषण हल्ला मानला जातो.

सीआरपीएफच्या ७४व्या बटालियनमधील जवानांची ही तुकडी नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या काम करत होती. आज दुपारी १२.२५ च्या सुमारास ही तुकडी बुरकापाल- चिंतागुफा दरम्यानच्या परिसरात काम करत होती. या तुकडीत ९० जवान होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. दक्षिण बस्तरचा हा परिसर नक्षली हल्ल्यांसाठी कुख्यात आहे. नक्षलवाद्यांनी बुरकापाल गावानजीक गस्त घालणाऱ्या पथकावर गोळीबार केला. यामध्ये सहा जवान जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती नक्षलविरोधी मोहिमेचे विशेष महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी पीटीआयला दिली. दरम्यान, या हल्ल्यानंतर बचावकार्याला सुरूवात झाली असून घटनास्थळी आणखी पोलिसांची कुमकही तैनात करण्यात आली आहे. जखमींमध्ये सहनिरीक्षक आर.पी.हेरंब, हेड कॉन्टेबल राम मेहर, कॉन्स्टेबल स्वरूप कुमार, कॉन्स्टेबल मोहिंदर सिंग, कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार, कॉन्स्टेबल शेर मोहम्मद आणि कॉन्स्टेबल लट्टू ओरान यांचा समावेश आहे. या सर्वांना रायपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या वर्षाच्या सुरूवातीला सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २१९ व्या बटालियनचे १२ जवान शहीद झाले होते. कोट्टाचेरू येथील घनदाट जंगलात हा हल्ला करण्यात आला होता.

दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यातही आज मोठा अनर्थ टळला. नक्षलवाद्यांनी पेरलेली १० किलो आयईडी स्फोटके वेळीच निकामी करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.