दुबईहून निघालेले मालवाहू जहाज पळवले

चाच्यांनी सोमालियाच्या तटवर्ती क्षेत्रांत एका छोटय़ा मालवाहू बोटीचे अपहरण केले असून या बोटीवर ११ भारतीय खलाशी आहेत, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

येमेनच्या सोकोत्रा बेट आणि सोमाली तटवर्ती क्षेत्र यांच्या मध्ये असलेल्या अरुंद मार्गिकेमधून ही बोट जात असताना शनिवारी त्याचे अपहरण करण्यात आले, असे ड्राएड मेरिटाइम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रॅमी गिब्बन यांनी सांगितले. चाच्यांनी ही बोट सोमालियाच्या उत्तरेकडे असलेल्या आयल परिसरात नेली आहे.

दुबईहून ही छोटी लाकडी बोट सोमालियातील बोसाको येथे जात होती. सोमालियाच्या तटवर्ती क्षेत्रांत होणारी चाचेगिरी ही जागतिक पातळीवरील नौवहन उद्योगासाठी गंभीर बाब आहे.

या देशाजवळच्या तटवर्ती क्षेत्रांत गस्त घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यानंतर अपहरणांच्या घटनांमध्ये घट झाली होती. चाच्यांना या बोटीवर असलेला माल लुटावयाचा आहे, त्यांच्याकडून अद्याप खंडणीची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. ही बोट किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर माल उतरवून बोट सोडून दिली जाईल, अशी शक्यता असल्याचे नौवहन महासंचालिका मालिनी शंकर यांनी म्हटले आहे.