रशियाजवळील समुद्रामध्ये दोन जहाजांना भीषण आग लागल्याने त्यामधील ११ खलाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भारतीय, तुर्कस्तान आणि लिबियन खलाशांना घेऊन जाणारी जहाजे समुद्रामध्ये इंधन भरताना ही आग लागली. या आगीमध्ये एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण बेपत्ता आहेत. या अपघातानंतर जहाजांवरील १२ खलाश्यांना वाचवण्यात रशियन समुद्री प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. क्रिश्चिया आणि रशियादरम्यान असणाऱ्या कर्च कालव्याजवळच्या भागामध्ये हा अपघात झाला. मृत खलाशी कोणत्या देशाचे आहेत याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

काल रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दोन्ही बोटी या टांझानिया देशाच्या मालकीच्या होत्या. एका जहाजामध्ये ‘लिक्वीफाइड नॅचरल गॅस’ (एलएनजी) होता तर दुसऱ्यामध्ये टँकर्स होते. एका जहाजामधील इंधन दुसऱ्या जहाजामध्ये भरताना झालेल्या अपघातामुळे भीषण आग लागली. यापैकी ‘कॅण्डी’ नावाच्या जहाजावर १७ जण होते. त्यापैकी नऊ तुर्कीस्तानचे होते तर आठ जण भारतीय नागरिक होते. दुसऱ्या जहाजाचे नाव ‘मेस्ट्रो’ असे होते. या जहाजामध्ये एकूण १५ जण होते. यामध्ये सात तुर्कीस्तानचे, सात भारतीय आणि एकजण लिबीया देशाचा होता. या अपघातामध्ये दोन्ही जहाजांवरील ३२ जणांपैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त रशियातील आरटी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

एका जहाजाला आग लागली आणि त्यानंतर ती दुसऱ्या जहाजावर परसल्याची प्राथमिक शक्यता असल्याची माहिती रशियन समुद्री प्राधिकारणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. जहाजांना आग लागल्यानंतर काहीजणांनी समुद्रामध्ये उडी मारली. त्यापैकी १२ जणांना वाचवण्यात यश आले असून ९ जण अद्यापही बेपत्ता आहेत. समुद्रामधील मोठ्या लाटांमुळे जखमींना लगेच समुद्रकिनाऱ्यावर आणण्यामध्ये अडचणी येत आहेत.