20 February 2019

News Flash

Gold Rush : राजस्थानच्या पोटात आढळले 11.4 कोटी टन सोन्याचे साठे

अब्जावधी कोटी रुपये किमतीचे सोन्याचे साठे

( संग्रहीत छायाचित्र )

राजस्थानच्या जमिनीखाली 11.48 कोटी टन इतका प्रचंड सोन्याचा साठा आढळला आहे. बन्सवारा व उदयपूर या शहरांजवळील जमिनीच्या पोटात 300 फूटांवर हे साठे असल्याच्या वृत्ताला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्य संचालक एन. कुटुंब राव यांनी सांगितलं की बन्सवारा, उदयपूर व सिकर जिल्ह्यातील नीम का थाना या भागांमध्ये यासंदर्भात काम सुरू असून तांबं व सोनं यांचे प्रचंड साठे सापडले आहेत. हे साठे जमिनीखाली 300 फूटांवर असल्याचंही राव म्हणाले.

सोनं व तांबं याखेरीज जस्त व शिसं या खनिजांचे जयपूरजवळ आढळले आहेत. राजपुरा – दारिबा या क्षेत्रामध्ये जस्त व शिशाचे 35 कोटी टनांचे साठे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भिलवाडा येथेही या संदर्भात संशोधन सुरू असून राजस्थानच्या विविध भागांमध्ये भूगर्भात प्रचंड प्रमाणात मौल्यवान खनिजांचे साठे असल्याचे समोर येत आहे. आत्तापर्यंत 8 कोटी टनांचे तांब्याचे साठेही राजस्थानमध्ये असल्याचे आढळले आहे.

राजस्थानची भूमी ही खनिजांसाठी सुपीक असल्याचे दुसऱ्याबाबतीतही दिसून आले आहे. राजस्थानातील वाळवंटातून रोज 1.7 लाख बॅरल इतकं खनिज तेल रोज काढण्यात येतं. त्याशिवाय दुर्मिळ अशी काही मूलद्रव्येही राजस्थानच्या पोटात असल्याचे अहवाल दोन वर्षांपूर्वी आले होते. या दुर्मिळ मूलद्रव्यांमध्ये 17 नैसर्गिक रसायनांचा समावेश आहे. ही रसायने अणूक्षेत्र, अवकाशसंसोधन, रसायनशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये बहुमोलाची आहेत.
जगभरात मागणी असलेल्या दुर्मिळ मूलद्रव्यांच्या व खनिजांच्या बाबतीत राजस्थान समृद्द असल्याचे आढळून आले आहे. केवळ सोन्याचा विचार केला तर 11.4 कोटी टनांचे म्हणजे महाप्रचंड साठे राजस्थानमध्ये असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

भारत दरवर्षाला साधारणपणे 700 टन सोन्याची आयात करतो याची तुलना केली तर 11.4 कोटी टन म्हणजे किती प्रचंड साठे असतील याची कल्पना येते. या सोन्याच्या साठ्यांचे मूल्य केवळ काढायचे म्हटले तर ते काही अब्ज कोटी रुपयांमध्ये होते. राजस्थानचं नाही तर भारत या सोन्याच्या उपलब्धीमुळे भविष्यात मालामाल होईल अशी शक्यता आहे.

First Published on February 13, 2018 1:34 pm

Web Title: 114 crore tonne gold found under rajsthan