बुर्किना फासोतील औगाडौगोऊ येथून अल्जिअर्सकडे झेपावलेले एअर अल्जिअर्सचे प्रवासी विमान कोसळून ११६ जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. विमानात ११० प्रवासी व सहा कर्मचारी होते.  ‘मॅकडोनल डग्लस एमडी-८३’ जातीचे हे विमान ‘स्विफ्टएअर’ या स्पॅनिश कंपनीकडून भाडय़ावर घेण्यात आलेले होते.
औगाडौगोऊ विमानतळावरून विमानाने गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर तासाभरातच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यावेळी ते माली देशाच्या हवाईक्षेत्रात होते. रात्री उशिरापर्यंत या विमानाचा ठावठिकाणा समजत नव्हता. अखेरीस विमान कोसळल्याचे अधिकृत सूत्रांनी जाहीर केले. या विमानात ५१ फ्रेंच तर अन्य २६ नागरिक होते. याशिवाय अल्जेरियाचे सात लेबनॉनचे २० तर कॅनडा, युक्रेन व लक्झेम्बर्ग या देशांचेही प्रवासी होते. तर विमानातील कर्मचारी स्पेनचे नागरिक होते. अल्जेरियच्या सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.