आसाममधील सरकारी रुग्णालयात २४ तासात १२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. गुवाहाटामधील सरकारी रुग्णालयात ही घटना घडली आहे. रात्री कामावर असणारे डॉक्टर जागेवर नसतात असा आरोप होत असतानाच हे मृत्यू झाले आहेत.

१२ पैकी ९ रुग्ण हे आयसीयूत दाखल होते. मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा कमी होती अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक अभिजीत सरमा यांनी दिली आहे. इतर करोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात असा आरोप केला आहे.

आरोग्य मंत्र्यांनी रात्री रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली तसंच मंगळवारी रात्री या घटनेसंबंधी वरिष्ठ डॉक्टरांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. अभिजीत सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयसीयूत दाखल अनेक रुग्णांना इतर व्याधीही होत्या आणि त्यापैकी अनेकजण हे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल झाले होते. सपोर्टवर असतानाही त्यांची ऑक्सिजन पातळी ९० च्या पुढे गेली नाही”.

यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी कोणीही करोनाची लस घेतली नव्हती अशी माहिती देताना लसीकरणाचं आवाहन केलं आहे. तसंच मृत्यू टाळण्यासाठी लवकरात लवकर रुग्णालयात दाखल व्हावं असं आवाहन करोना रुग्णांना केलं आहे. रुग्णालयात जवळपास २०० करोना रुग्ण दाखल आहेत.

राज्यात सध्या २५ हजार ०४३ अॅक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हिटी रेट २.०१ आहे. तर रिकव्हरी रेट ९३.८७ असून मृत्यू दर ०.८९ आहे.