तिरकस लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्समधील चार्ली हेबडो मासिकाच्या कार्यालयात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात बुधवारी १२ जणांना प्राणाला मुकावे लागले. या हल्ल्यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण फ्रान्समधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याच मासिकाच्या कार्यालयावर २०११ मध्येही हल्ला करण्यात आला होता. प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यावेळी हल्ला करण्यात आला होता.
मासिकाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मासिकाच्या कार्यालयातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वां ओलांद यांनी हा अतिरेकी हल्लाच असल्याचे म्हटले आहे. गोळीबाराबद्दल समजल्यावर लगेचच ते घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली आहे.
फ्रान्समधील स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मास्क घातलेले दोन तरूण या मासिकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारामध्ये दहा पत्रकारांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पॅरिसमधील सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हल्लेखोरांच्या गोळीबारामध्ये दोन सुरक्षारक्षकांचाही मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही अतिरेकी कार्यालयाबाहेर असलेल्या गाडीतून पळून गेले. या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, सर्व माध्यमांच्या कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.