उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातही गोळीबार
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींना लक्ष्य करत स्फोट घडवला. क्वेटा शहरातील सरदार बहादूर खान महिला विद्यापीठाच्या आवारात बसमध्ये हा स्फोट झाला. त्यात १२ विद्यार्थिनी ठार तर २२ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
विद्यार्थिनी आणि प्राध्यापक घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. त्या वेळी बसमध्ये स्फोट झाला. यात अनेक मुली गंभीर जखमी झाल्या. स्फोटामुळे बसला भीषण आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ विद्यार्थिनी यामध्ये दगावल्या. २२ जखमींना बोलन मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमींना इस्पितळात आणले जात असतानाच दहशतवाद्यांनी तिथे प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी तेथे प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी होते.
क्वेट्टाचे उपायुक्त अब्दुल मन्सूर काकर हे ठार झाल्याचे वृत्त चित्रवाणी वाहिन्यांनी दिले आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी मोहीम उघडली. काही दहशतवाद्यांनी रुग्णालयाच्या छतावर आश्रय घेऊन त्या इमारतीत प्रवेश करणाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही.