नैऋत्य चीनमधील शिचुआन प्रांतात दोन शक्तिशाली भूकंपात १२ ठार, तर १२५ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १०.५५ वाजता सहा रिश्टरचा भूकंप यिबीन शहरात झाला, तर दुसरा भूकंप मंगळवारी झाला. त्याची तीव्रता ५.३ होती. आतापर्यंत बारा लोक भूकंपात मारले गेले असून इतर १२५ जण जखमी झाले आहेत. असे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने म्हटले आहे. सोमवारच्या भूकंपाचे केंद्र सोळा कि.मी. खोल होते. घरे कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला. चँगनिंग येथील रुग्णालयात ५३ लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तर सहाजण गंभीर जखमी आहेत.

चेंगडू व यिबीन येथे भूकंपाचा इशारा देणाऱ्या यंत्रणा बसवण्यात आलेल्या असून त्यातून भूकंपाच्या आधी धोक्याची घंटा वाजली होती. संपूर्ण प्रदेशात काही ठिकाणी प्राणहानी झाली. दोनजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्यातील एकाची स्थिती चिंताजनक आहे. चारजणांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यिबीन येथील लोकांनी सांगितले की, भूकंपानंतर अर्धा तास लहान धक्के जाणवत राहिले. चेंगडू या प्रादेशिक राजधानीत भूकंपाच्या एक मिनिट आधी पूर्वसूचनेची घंटा वाजली होती त्यानंतर एकाच मिनिटात भूकंपाचे धक्के जाणवले. आपत्कालीन मंत्रालयाने म्हटले की, भूकंपग्रस्त भागात मदत पथके पाठवण्यात आली आहेत. राष्ट्रीय अन्न व रसद प्रशासनाने पाच हजार तंबू, १० हजार घडीचे बिछाने, रजया भूकंपग्रस्त भागात पाठवण्यात आल्या आहेत. शिचुआन प्रांतातून ६३ अग्निशमन बंब व ३०२ जवान पाठवण्यात आले आहेत. या भूकंपाने यिबीन व झुयाँग यांना जोडणाऱ्या रस्त्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे दोन महामार्ग बंद करण्यात आले आहेत.