सिग्नल तोडून पुढे निघालेल्या जलदगती एक्स्प्रेसने पुढे असलेल्या दुसऱया रेल्वेला जोरदार टक्कर दिल्यामुळे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये १२ प्रवासी ठार तर ४५ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास गोरखपूरपासून सात किलोमीटरवर असलेल्या नंदनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ हा अपघात घडला.
मादुधी-लखनौ क्रिषक जलदगती एक्स्प्रेसने पुढे असलेल्या बदाऊनीकडे निघालेल्या एक्स्प्रेसला जोरदार टक्कर दिली. क्रिषक एक्स्प्रेसच्या चालकाने सिग्नल तोडल्यामुळेच ती पुढे जाऊन दुसऱया रेल्वेला धडकली, असा आरोप करण्यात येत आहे. उत्तर-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अलोककुमार सिंग यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली.
क्रिषक एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेमध्ये बदाऊनी एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा चेंदामेंदा झाला. याच डब्यातील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर-पूर्व रेल्वेने क्रिषक एक्स्प्रेसचे चालक राम बहादूर आणि सहायक चालक सत्यजित यांना सिग्नल मोडल्याबद्दल तातडीने निलंबित केले आहे. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांपैकी १२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेने या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.