जलालाबाद : अफगाण सुरक्षा दलांच्या वाहनाजवळ करण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटात १२ जण ठार झाले असून त्यात बहुतांश नागरिकांचा समावेश आहे. अलीकडचा हा सर्वात भीषण हल्ला असून प्रांतिक गव्हर्नरांचे प्रवक्ते अताउल्ला खोगयानी यांनी सांगितले, की पूर्वेकडील जलालाबाद येथे झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले होते.

या हल्ल्यात पेट्रोलपंप पेटवून देण्यात आला. काही जणांना रूग्णालयात आणण्यात आले ते मोठय़ा प्रमाणात भाजले होते, असे आरोग्य संचालक नजीबुल्ला कामवाल यांनी सांगितले. इस्मतुल्ला याने सांगितले,की मी आगीचा गोळाच जवळ येताना पाहिला. लोक यात भाजून निघाले. टोलो न्यूजने या हल्ल्याची चित्रफीत ऑनलाइन टाकली आहे. त्यात अनेक जळालेली वाहने दिसत असून या हल्ल्यात अनेक दुकाने भस्मसात झाली.

आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी अमाक प्रचार संस्थेच्या माध्यमातून घेतली असून त्यांनी अलिकडे पाकिस्तानलगतच्या नांगरहार प्रांतात हल्ला केला होता. आयसिसने असा दावा केला, की गेल्या काही आठवडय़ात अनेक आत्मघाती बॉम्बहल्ले आम्ही केले असून अफगाण व अमेरिकी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात येत आहे. तालिबान हा अफगाणिस्तानातील मोठा दहशतवादी गट असून आयसिस हा तुलनेने लहान गट आहे, पण पूर्व व उत्तरेकडे आयसिसचा धुमाकूळ सुरू आहे. आजचा हल्ला हा अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी अफगाण सरकार व तालिबान यांच्यात शांतता चर्चेची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर झाला आहे.

पॉम्पिओ यांच्या दौऱ्याने अफगाणिस्तानात शांतता निर्माण होण्याची आशा पालवली होती. रमझानच्या सुटीत अफगाण सुरक्षा दले व तालिबानी दहशतवाद्यांनी सतरा वर्षांचे युद्ध थांबवून आनंदोत्सव साजरा केला होता पण नंतर पुन्हा हल्ल्यांचे सत्र सुरू झाले आहे.