ऑनलाइन क्लास आणि अभ्यासाला कंटाळून १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील राजकोट येथे ही घटना घडली आहे. लॉकडाउनमुळे हातातील काम सुटल्याने वडिलांनी खूप संघर्ष करुन मुलीला स्मार्टफोन विकत आणून दिला होता. अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाइन क्लासचा तणाव, गृहपाठ आणि शाळेतील मैत्रिणींना भेट शकत नसल्याने आलेला मानसिक तणाव यामुळे मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

सोमवारी सकाळी मुलीच्या आईने तिला अभ्यास करायला सांगितलं. यावेळी कारण देत ती आपल्या रुममध्ये निघून गेली. काही वेळाने आईने जाऊन पाहिलं असता तिने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं दिसलं. मुलगी आपले आई-वडील आणि भावासोबत राहत होती. नुकतंच तिला एका गुजराती भाषिक शाळेत दाखल केलं होतं. लॉकडाउनुळे तिला आठवीच्या इयत्तेत प्रवेश मिळाला होता.

मुलीच्या वडिलांचं ऑटो गॅरेज आहे. पैशांची समस्या असतानाही त्यांनी मुलीला ऑनलाइन क्लाससाठी १० हजारांचा स्मार्टफोन विकत आणून दिला होता. कुटुंबाकडे वीजबील भरण्यासाठी पैसे नाहीत असं एका नातेवाईकाने सांगितलं आहे.