१२ वर्षाच्या मुलीचा वडिलांच्या पिस्तूलसोबत खेळताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लखनऊत ही घटना घडली आहे. मुलगी वडिलांच्या पिस्तूलसोबत खेळत होती आणि चुकून तिच्याकडून गोळी सुटली. उपचारासाठी तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस निरीक्षक राज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठाकुरगंज परिसरात ही घटना घडली. नरेंद्र सिंह गुरुवारी संध्याकाळी घरी आले असता कपडे बदलताना त्यांनी पिस्तूल डायनिंग टेबलवरच ठेवलं होतं. यावेळी त्यांची मुलगी आयुषी सिंहने पिस्तूल उचललं आणि त्याच्यासोबत खेळू लागली. खेळताना मुलीने बंदूक आपल्या डोक्यावर ताणली आणि आत्महत्या करत असल्याचं नाटक करु लागली. याचवेळी अपघाताने तिच्याकडून गोळी सुटली’.

कुटुंबाने तात्काळ किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ट्रॉमा सेंटरमध्ये धाव घेतली. पण तिचा जीव वाचू शकला नाही. पोलिसांनी पिस्तूल जप्त केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.