गुजरातमधील सुरतमध्ये १२ वर्षांच्या खुशी शाहने दीक्षा घेतली आहे. या जगात जितका आनंद आहे तो सगळा काही वेळेपुरता आहे, पण साधं आयुष्य जगण्याने शांती आणि मोक्ष मिळू शकतो असं खुशीचं म्हणणं आहे. आपण लहान होतो तेव्हा कुटुंबातील अनेकांनी दीक्षा घेतली होती असं खुशीने सांगितलं आहे. बुधवारी खुशीला जैन दीक्षा देण्यात आली.

खुशीच्या कुटुंबात दीक्षा घेणारी ती पहिली व्यक्ती नाही. याआधी तिच्या कुटुंबातील चार जणांनी दीक्षा घेतली आहे. जेव्हा मी चार वर्षांची होते, तेव्हा कुटुंबातील चार जणांनी दीक्षा घेतली होती असं खुशीने सांगितलं आहे.

खुशीचे वडील विनीत शाह सरकारी कर्मचारी आहेत. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकदा साध्वी झाल्यानंतर ती लोकांचं आयुष्य प्रकाशमय करण्याचं काम करेल. खुशीला सहावीमध्ये ९७ टक्के मार्क मिळाले आहेत. नोव्हेंबरमध्ये तिने शाळा सोडली. खुशीने हजारो किमी अंतर पायी चालत पूर्ण केलं असून, दीक्षा घेतल्यानंतर आयुष्य कसं असतं हेदेखील तिने जवळून पाहिलं असल्याचं तिचे वडील सांगतात.