पुण्यातील एका बारा वर्षीय मुलाने समुद्र स्वच्छ करुन त्यामधील प्रदूषण कमी करण्यासाठी एका जहाजाची संकल्पना सादर केली आहे. हाझीक काझी असे या पुणेकर मुलाचे नाव असून त्याने ‘एरवीस’ या जहाजाची संकल्पना मांडली आहे. या जहाजामुळे समुद्रातील कचरा साफ करण्यास मदत होईल आणि जलचरांचे संवर्धनही करता येईल असा दावा हाझीकने केला आहे.

आपल्या या प्रकल्पाबद्दल एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हाझीकने माहिती दिली. मी लहान असताना काही डॉक्युमेन्ट्री पाहिल्या होत्या. तेव्हा समुद्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे मला जाणवले. तेव्हाच आपण यासाठी काहीतरी करायला हवे असं मी मनाशी ठरवलं. आपण जे मासे खाद्य म्हणून खातो ते मासेच समुद्रातील प्लॅस्टिक खात असतील तर आपण केलेले प्रदूषण आपल्यासाठीच घातक ठरत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हेच प्रदूषण कमी करण्यासाठी मी ‘एरवीस’ची निर्मिती केली आहे.’

एसरवीस या जहाजामागील संकल्पना काय आहे आणि ते कसे काम करणार याबद्दल बोलताना, ‘जहाजाच्या खाली असणारे सॉरर्स (बशीच्या आकाराची उपकरणे) सेंट्रिपेटल फोर्सच्या (केंद्राकडे खेचला जाणारे बळ) मदतीने समुद्रातील गोष्टी जहाजामध्ये खेचून घेईल. त्यानंतर जहाजामधील यंत्रणा या गोष्टींचे तीन भागांमध्ये वर्गिकरण करेल. पाणी, समुद्रातील जलचर आणि कचरा. यापैकी पाणी आणि जलचर पुन्हा समुद्रात सोडून देण्यात येतील आणि कचऱ्याचे पुढे पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गिकरण करण्यात येईल.’ असं हाझीकने सांगितले.

अनेक संस्था आणि माध्यमांच्या मदतीने हाझीकने अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली संकल्पना सादर केली आहे. हाझीकने अगदी ‘टेडएक्स’ आणि ‘टेडएट’सारख्या मंचांवरूनही ही संकल्पना जगभरातील अनेक पर्यावरण तज्ञांपर्यंत पोहचवली आहे. त्याची ही कल्पना अनेक पर्यावरणवादी संस्थांना आणि तज्ञांना पसंत पडली आहे.

समुद्रामधील प्लॅस्टीक कचरा जहाजामध्ये खेचला जाऊन त्याचे आकारानुसार वर्गिकरण करण्यात येईल. तसेच जहाजाच्या तळाशी असणाऱ्या सेन्सर्सच्या मदतीने जहाजात खेचण्यात आलेल्या पाण्यामधील जलचर आणि कचरा वेगळा करण्यात येईल. कचरा जहाजात आतमध्ये खेचला जाईल तर पाणी जहाजाच्या खालच्या भागातूनच पुन्हा समुद्रात सोडले जाईल.

मी नऊ वर्षांचा असतानाच अशाप्रकराच्या जहाजाचा विचार केला होता. समुद्रातील जलचरांसाठी आपण काहीतरी करायला हवे या विचाराने मी हे मॉडेल तयार केले. अनेक डॉक्युमेन्ट्री आणि इंटरनेटवरून समुद्रातील प्रदुषणाबद्दलची माहिती मिळवल्यानंतर मी या जहाजाचे डिझाइन केल्याचे हाझीक म्हणाला. सध्या हाझीक हा वेगवेगळ्या संस्थांबरोबर आणि पर्यावरण तज्ञांबरोबर त्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. तो या सर्वांच्या मदतीने समुद्रातील प्रदूषण आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती करत आहे.