दोन दिवसांपूर्वीच लेबनॉनच्या बैरुत या शहरात अमोनियम नायट्रेटचे महाभीषण असे दोन स्फोट झाले होते. यामध्ये १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. भारतातल्या चेन्नईतली ७०० टन अमोनियम नायट्रेटचा साठा आहे. हा साठा ज्या ठिकाणी आहे, त्या परिसरात एक दोन नाही तब्बल १२ हजार लोकांची वस्ती आहे. समजा बैरुतसारखी घटना चेन्नईतही घडली तर त्याचा थेट फटका या सगळ्या लोकांना बसू शकतो. त्यामुळेच या साठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे. तामिळनाडू पोल्युशन कंट्रोल बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे. ‘द न्यूज मिनिट’ ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२०१५ मध्ये तामिळनाडूच्या एका आयातदाराकडून १.८० कोटी रूपयांचं रसायन जप्त करण्यात आलं होतं. दक्षिण कोरियामधून आयात करण्यात आलेला माल सुरक्षित आहे आणि तो काढण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे,” अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

सीबीआयसीने सीमाशुल्क आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला त्वरित पडताळणी करण्यास सांगितलं आहे. देशभरातील गोदामांमध्ये व बंदरांमध्ये कोणतीही धोकादायक व स्फोटक सामग्री सर्व सुरक्षा आणि अग्निशामक मापदंडांची पूर्तता करत असल्याची ४८ तासात पडताळणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसंच मानवी जीवन आणि संपत्तीलाही धोका नसल्याची पडताळणी करण्यास सांगण्यात आलं आहे.

“अमोनियम नायट्रेटमुळे चेन्नईच्या गोदामातही बैरुतसारख्या स्फोट होण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी चेन्नईच्या गोदामातील अमोनियम नायट्रेट सुरक्षितपणे ठिकाणाहून हटवणं आवश्यक आहे. तसंच त्याचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य वापर केला गेला पाहिजे,” असं मत पीएमकेचे प्रमुख डॉ. रामदास यांनी म्हटलं.