देशात गेल्या २४ तासांत आणखी १२ हजार १४३ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, आठ लाख,९२ हजार, ७४६ वर पोहोचली आहे. तर १.६ कोटीहून अधिक जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

करोनामुळे आणखी १०३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख, ५५ हजार, ५५० वर पोहोचली आहे. करोनातून आतापर्यंत एक कोटी, सहा लाख, ६२५ जण बरे झाले आहेत त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.३२ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मृत्युदर १.४३ टक्के इतका आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १.५ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या एक लाख, ३६ हजार, ५७१ उपचाराधीन रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १.२५ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांत १०३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला त्यापैकी ३६ जण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ५१ हजार, ४५१ जणांचा मृत्यू झाला आहे.