18 January 2021

News Flash

बारावी पास बोगस डॉक्टरने ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर केले उपचार!

पाच वर्षांपूर्वी मथुरेत त्याला रेल्वेतून प्रवास करताना एका डॉक्टरचे पदवीचे प्रमाणपत्र सापडले, त्यावर आपला फोटो लावून त्याने बोगस प्रमाणपत्र तयार केले होते.

संग्रहित

केवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा राजस्थान पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टरने गेल्या ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर उपचार केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, बाघेल सिंह असे या ४४ वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव असून तो राजस्थानच्या सिकार जिल्ह्यातील पलसाना येथील रुग्णालयात रुजू होता. याच रुग्णालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो या रुग्णालयात काम करीत होता. त्यासाठी महिन्याला १ लाख रुपये पगारही तो घेत होता. गेल्या ९ वर्षांपासून बाघेल उत्तर प्रदेश आणि राजस्थानात डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होता. या काळात त्याने ९० हजार रुग्णांवर उपचारही केले आहेत. खुद्द त्यानेच पोलिसांसमोर कबूल केले की त्याने कोणत्याही वैद्यकीय डिग्रीशिवाय आपल्या डॉक्टरकीची सुरुवात आग्रा शहरातून केली होती.

त्याने पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब सांगितली ती म्हणजे, पाच वर्षांपूर्वी मथुरेत त्याला रेल्वेतून प्रवास करताना डॉ. मनोजकुमार यांचे वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र सापडले. त्यानंतर त्याने या प्रमाणपत्रावरील डॉ. मनोजकुमार यांचा फोटो हटवून त्याठिकाणी आपला फोटो लावला आणि बोगस डिग्री तयार केली.

त्यानंतर बाघेल याने एकदा सिकार येथील रुग्णालयात डॉक्टरचे रिक्तपद भरण्याची जाहीरात वाचली आणि त्याने या पदासाठी अर्ज केला. त्यानंतर त्याची रितसर मुलाखत आणि या पदासाठी निवडही झाली. या रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याने ज्या रुग्णांवर उपचार केले त्यांच्याकडून डॉक्टरविरोधात तक्रारी यायला लागल्या. एकदा तर हृ्दयविकाराचा त्रास असलेल्या एका रुग्णावर बाघेलाकडून उपचार सुरु असताना त्याची प्रकृती आणखीनच बिघडली त्यानंतर त्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाला बाघेलवर संशय आला आणि त्यांनी त्याच्या चौकशीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी बाघेलचे मतदान ओळख पत्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटशी पडताळून पाहिल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर त्याला फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:11 pm

Web Title: 12th pass man have bogus mbbs certificate he treats 90000 patients over 9 years aau 85
Next Stories
1 भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण
2 डॉक्टरांनी केला कहर! डावा हात फ्रॅक्चर पण उजव्या हाताला घातले प्लास्टर
3 निवडणूक देशाने हरली म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही – नरेंद्र मोदी
Just Now!
X