काबूल संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीजवळ हल्ला
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात घडविण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान १३ जण ठार, तर ४० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आल्यानंतर अवघ्या काही तासांतच आणखी एका आत्मघातकी हल्लेखोराने काबूलमधील संरक्षण दलाच्या इमारतीजवळच स्वत:ला उडविल्याने जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान आणि अमेरिका हे देश तालिबान्यांशी चर्चेची तयारी करीत असतानाच हे हल्ले करण्यात आले आहेत. संरक्षण दलाच्या इमारतीजवळ हल्ला करण्यात आला असून जीवितहानी झाली आहे, असे काबूलचे पोलीस प्रमुख अब्दुल रेहमान रहिमी यांनी सांगितले. मात्र किती जण ठार झाले आहेत अथवा जखमी झाले आहेत ते त्यांनी स्पष्ट केले नाही. संरक्षण दलाच्या इमारतीजवळ चालत येऊन आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडविल्याचे प्रवक्त्याने सांगितले.