सालेम : तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलेल्या गज वादळाच्या तडाख्यात १३ जणांचा मृत्यू झाला. वादळाच्या तडाख्याने मोठय़ा प्रमाणावर घरांची पडझड झाल्याने ८२ हजार लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

वादळाने नागपट्टीनम आणि वेदारनायमदरम्यानचा किनारा जवळजवळ उद्ध्वस्त केला आहे. तिरुवरूर, नागपट्टीनम, तंजावूर, कड्डलोर, पुदुकोट्टाई आणि रामनाथपुरम या जिल्ह्य़ांना वादळी पावसाने झोडपून काढले. नागपट्टीनम जिल्ह्य़ाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्याने वादळग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने वादळग्रस्त जिल्हे अंधारात आहेत. वादळाचा सर्वाधिक तडाखा नागपट्टीनम जिल्ह्य़ाला बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.

मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये भरपाई देण्याचे पलानीस्वामी यांनी जाहीर केले. गंभीर जखमींना १ लाख तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तमिळनाडूला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले असून केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.