अमेरिकेत ओहियोच्या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील आठ जणांची हत्या करण्यात आली. त्यात एका किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. जॉर्जियात बंदूकधाऱ्याने पाच जणांना ठार केले. ओहियोत एकाशेजारी एक असलेल्या तीन घरांत सात मृतदेह सापडले असून, एका घरात आठवा मृतदेह सापडला असे नगरपाल चार्ल्स रीडर यांनी सांगितले.
मृतांमध्ये एका मुलाचा अपवाद वगळता बाकीचे सर्व जण हे प्रौढ होते. मुलगा १६ वर्षे वयाचा होता. दोन बालके गोळीबारात वाचली असून, त्यात एकाचे वय चार दिवस असून दुसरे सहा महिन्यांचे आहे. तीन वर्षे वयाचे मूलही गोळीबारातून वाचले आहे. अधिकाऱ्यांनी या हत्यांमागे असलेल्या हेतूबाबत काही सांगितलेले नाही. अजून एक बंदूकधारी फरार असून कुणाला अटक करण्यात आलेली नाही. बहुतांश प्रत्येकालाच डोक्यात गोळय़ा मारण्यात आल्या आहेत, असे ओहियोचे महाधिवक्ता माइक डेवाइन यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार मृतांपैकी कुणीही आत्महत्या केलेली नाही. बंदूकधारी व्यक्ती किती होत्या की एकच जण होता हे समजू शकलेले नाही व ते हातीही लागलेले नाहीत.
अनेक जणांना ठार केले तेव्हा ते बिछान्यात होते. युनियन हिल रोड होम्स या पाइक काउंटी तीन घरांत हा प्रकार घडला. पाइक काउंटी येथे या घटनेनंतर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. ओहियोचे गव्हर्नर व अध्यक्षीय उमेदवार जॉन कॅसिच यांनी सांगितले, की ही परिस्थिती समजण्यापलीकडे आहे.
दरम्यान, उत्तर जॉर्जियात दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये कौटुंबिक कारणातून पाच जणांची हत्या झाल्याचे समजते. कोलंबिया परगण्याच्या नगरपालांनी ही माहिती दिली. स्थानिक अधिकारी व्हेरनॉन कॉलिन्स यांनी सांगितले, की घरगुती वादातून दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत बंदुकीमुळे दरवर्षी ३० हजार लोकांचे बळी जातात.
दरम्यान, रिपब्लिकन सदस्यांनी नॅशनल रायफल असोसिएशनची बाजू घेऊन ओबामा यांच्या बंदूक नियंत्रण विधेयकाला विरोध केला आहे.