इस्रायलमधील १३ जणांना करोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. विनोने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. “मला जवळजवळ २८ तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत होता,” असं व्हायनेटशी बोलताना एका व्यक्तीने सांगितलं. मात्र नंतर आपण यामधून बाहेर आल्याचेही या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.

पॅरालिसिस बरा झाल्यावर आरोग्य मंत्रालयाने नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी आता या लोकांना शॉटचा दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. मला सुरुवातील चेहऱ्यातील स्नायूंच्या हलचालीमध्ये त्रास जाणवला. नंतर सारं काही लगेच ठीकं झालं असं झालं नसलं तरी आता प्रकृती आधीपेक्षा नक्कीच उत्तम आहे, असं करोना लसीचा साइफेक्ट दिसून आलेल्या एकाने असं व्हायनेटशी बोलताना सांगितलं. इस्रायलमध्ये २० डिसेंबर २०२० पासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ७२ टक्क्यांहून अधिक नागरिकांना करोनाची लस देण्यात आली आहे.

आणखी वाचा- COVID-19 Vaccination: देशात ४४७ जणांमध्ये दिसले लसीचे साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल; नगरमध्येही आठ जणांना लसीचा त्रास

नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू

नॉर्वेमध्येही करोना लसीकरणानंतर काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतानाच इस्रायलमधूनही करोना लसीच्या प्रतिकूल परिणामांचे वृत्त समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर २३ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. या लसीमुळे नॉर्वेत अनेक वृद्ध नागरिक आजारीही पडले आहेत. नॉर्वे डॉक्टरांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मृत्यू झालेल्या २३ लोकांपैकी १३ जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षण दिसून आली असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आणि चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फायझरनं युरोपमध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे. २३ जणांच्या मृत्यूनंतर ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात विशेष इशारा नॉर्वेच्या आरोग्य विभागानं दिला आहे. नॉर्वेत डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत ३० हजार लोकांना फायझर वा मॉर्डन या दोन्ही एका लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

भारतात करोनाच्या प्रतिकूल परिणामांची ४४७ प्रकरणं

भारतामध्येही पहिल्या दिवसाच्या लसीकरणानंतर  ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम म्हणजेच लसीचा साइड इफेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुरळ उमटणे, सूज येणे किंवा ताप येणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसण्याची एकूण ५१ प्रकरणे आढळली. लसीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही करोना लसीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लस घेतलेल्या एकूण दोन लाख २४ हजार ३०१ पैकी  ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु इतर ४४४ जणांना ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

परिचारिका आजारी, प्रकृती स्थिर

कोलकात्यामधील पस्तीस वर्षे वयाची परिचारिका लस घेतल्यानंतर आजारी पडली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. या परिचारिकेला लस दिल्यानंतर भोवळ आली. आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून सदर परिचारिकेची प्रकृती  स्थिर आहे.

नगरमध्ये आठ जणांना त्रास

करोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्रास झाला. खबरदारीचा  उपाय म्हणून तीन आरोग्य सेविकांवर  जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखरणा यांनी  सांगितले.