वर्गातील मॉनिटरच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. तेलंगणातील भोंगिर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षीय मुलाचे नाव चरन असे आहे. गुरुवारी रात्री चरणच्या पालकांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. शुक्रवारी रामन्नापेठ भागात त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

भोंगिरचे पोलीस उपायुक्त म्हणाले की, गुरूवारी रात्री चरणच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी रामन्नापेठ भागांमध्ये रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळला. चरण भोंगिर यथील कृष्णादेवी टॅलेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. जर चरणच्या पालकांनी शाळेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यास तात्काळ तपास सुरू केला जाईल.

चरणची आई विजयालक्ष्मी म्हणाल्या, १६ जुलै रोजी चरण शाळेतील मॉनिटरची निवडणुक हारला होता. पाच-सहा मतांच्या फरकाने पराभव झाल्यामुळे तो तणावात होता. गुरूवारी शाळेनंतर आमच्या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी तो तणावात दिसत होता. त्यानंतर तो बाहेर गेला. रात्रा ८ वाजल्या तरी घरी परतला नसल्यामुळे आम्ही तपास सुरू केला. अखेरीस आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली.