उद्योजक होण्यासाठी वयाचे बंधन नसते हे अमेरिकेत वास्तव्यास असणाऱया भारतीय वंशाच्या अवघ्या तेरा वर्षीय शुभम बॅनर्जीने सिद्ध करून दाखवले आहे. कॅलिफोर्नियाला राहणाऱया या तंत्रप्रिय लहानग्याने अंध व्यक्तींसाठीची ब्रेल लिपी छापून देणारा कमी खर्चीक प्रिंटर तयार करुन त्याची कंपनी देखील सुरू केली आहे.
एके दिवशी शुभमने सहज आपल्या कुटुंबियांना अंध व्यक्ती वाचन कसे करतात? असा साधा प्रश्न विचारला असता त्याच्या पालकांनी ‘गुगल’वर जाऊन याचे उत्तर शोधण्यास सांगितले. त्यानंतर शुभमने ‘गुगल’वर यासंदर्भात शोध घेण्यास सुरूवात केली आणि अंधव्यक्तींना सोयीस्कर ठरणारी ब्रेल लिपी छापून देणाऱया प्रिंटरची किंमत तब्बल २,००० डॉलर्स इतकी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मुख्यत्वे विकसनशील देशातील अंध व्यक्तींना इतके महाग प्रिंटर्स खरेदी करणे अशक्य असल्याचे त्याला समजले. हीच गोष्ट शुभमच्या तंत्रप्रिय वृत्तीला प्रेरणा देणारी ठरली आणि शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात शुभमने ‘लेगो रोबोटिक्स कीट’च्या साह्याने ब्रेल लिपी छापून देणारा प्रिंटर सादर केला.
printer-4ब्रेल लिपी आणि लेगो तंत्रज्ञान यांच्या संयुक्तीकरणातून शुभमने आपल्या प्रिंटरला ‘ब्रेगो’ नाव दिले आहे. शुभमच्या या ‘ब्रेगो’ प्रिंटरने सर्वांची वाहवा मिळवली तसेच अनेक पारितोषिकेही पटकावली. शुभमने तयार केलेला हा ‘ब्रेगो’ सध्या प्राथमिक स्वरुपाचा असला तरी, त्याला पुढील काळात ३५० डॉलर्समध्ये उपलब्ध होईल असा ‘डेस्कटॉप ब्रेल प्रिंटर’ तयार करायचा आहे. विशेष म्हणजे, तंत्रविश्वातील बलाढ्य ‘इंटेल’ कंपनीसाठी काम करणाऱया शुभमच्या वडिलांनी त्याच्यातील गुणांना ओळखून ३५,००० डॉलर्सच्या भांडवलावर शुभमसाठी ‘ब्रेगो लॅब’ सुद्धा सुरू करून दिली आहे. पालक म्हणून आम्ही त्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली असून काहीतरी नाविन्य निर्माण करण्याची शुभममध्ये सुरु झालेली प्रक्रिया यापुढेही अशीच कायम राहावी, यासाठी प्रयत्न राहतील, असे शुभमच्या वडिलांनी सांगितले.
printer-2
शुभमचा प्रिंटर पाहून इंटेल कंपनीचे अधिकारीही प्रभावित झाले. इतकेच नाही तर इंटेल कंपनीने शुभमच्या कंपनीत गुंतवणूक करून चांगली सुरूवात करून दिली आहे. तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी इंटेलकडून उद्यम भांडवल मिळविणारा सर्वात तरुण उद्योजक म्हणून शुभमची ओळख निर्माण झाली आहे.
printer-3