महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्यानं चर्चेत असून, अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी होत असतानाच अंगाचा थरकाप व्हावा, अशी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलीचं तीन वेळा अपहरण करून तिच्यावर पाच दिवस सातत्यानं सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
१३ वर्षीय मुलीचं तिला ओळखत असलेल्या एका व्यक्तीनं अपहरण केलं. ४ जानेवारी रोजी पीडितेचं अपहरण करण्यात आल्यानंतर अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याच्या सहा मित्रांनी तिच्यावर दोन दिवस सामूहिक अत्याचार केला. पीडित मुलीला सोडण्यापूर्वी म्हणजे ५ जानेवारी रोजी आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीमुळे मुलीनं याची वाच्यता केली नाही.
सहा दिवसांनी पुन्हा झाली वासनेची शिकार
सामूहिक अत्याचाराच्या हादऱ्यातून सावरण्याआधीच सहा दिवसांनी पुन्हा पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार झाला. पीडितेचं पुन्हा अपहरण करण्यात आलं. ११ जानेवारी रोजी अपहरण केल्यानंतर सात जणांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला जंगलात रस्त्याच्या बाजूला डांबून ठेवलं. तिथेही पीडितेवर पुन्हा तीन नराधमांनी अत्याचार केला.
पीडितेवरील अत्याचारांची मालिका इथेच थांबली नाही. त्यानंतर तीन जणांच्या अत्याचारानंतर दोन ट्रक चालकांनी पीडितेचं अपहरण केलं. अमानुष अत्याचारातून कशीबशी सुटका करून घेत पीडित मुलगी शुक्रवारी घरी पोहोचली. त्यानंतर ही हादरवून टाकणारी घटना समोर आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली. सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं असून, इतरांना लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस विभागाचे प्रवक्ते अरविंद तिवारी यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 11:29 am