लोकशाहीमध्ये अनेक पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार लोकांकडे असतो. आपल्या मागण्या, तक्रारी मांडण्यासाठी काहीजण मोर्चा काढतात, काहीजण आंदोलने करतात तर काहीजण अर्ज करतात. अनेक प्रयत्नानंतर अखेर यश येते आणि न्याय मिळतो. मात्र उत्तर प्रदेशमध्ये आठवीत शिकणाऱ्या एक मुलाने ३७ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहूनही त्याला एकदाही उत्तर मिळालेले नाही.

आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या सार्थक त्रिपाठी याने नुकतेच मोदींना ३७ वे पत्र पाठवले. ७ जून रोजी पाठवलेल्या या पत्रामध्ये सार्थकने त्याचे वडील सत्यजीत विजय त्रिपाठी यांना उत्तर प्रदेश स्टॉक एक्सचेंजमध्ये (युपीएसई) पुन्हा नोकरीवर घ्यावे अशी विनंती पंतप्रधान मोदींकडे केली आहे. २०१६ पासून सार्थक मोदींना याच मागणीसाठी पत्र लिहित आहे. अचानक वडिलांची नोकरी गेल्याने कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाबद्दल सार्थक अत्तापर्यंत अनेकदा मोदींना पत्राच्या माध्यमातून कळवले आहे. तसेच संपूर्ण त्रिपाठी कुटुंबाला यामधून बाहेर काढण्यासाठी माझ्या वडिलांना पुन्हा नोकरीवर घ्यावे अशी मागणीही सार्थक या पत्रांमधून केली आहे.

‘मोदी बाबाजींनी माझ्या वडिलांना मदत करावी यासाठी मी त्यांना पत्र लिहीत आहे. काही लोकांमुळे माझ्या वडिलांची युपीएसईमधील नोकरी गेली,’ असं सार्थकने एएनआयशी बोलताना सांगितले. सार्थकच्या या पत्रांचा त्रिपाठी कुटुंबाला अद्याप काहीच फायदा झाला नसून उलट त्यांना धमकीचे फोन येत असल्याचे एएनआयने म्हटले आहे. ‘माझ्या या पत्रांमुळेच माझ्या वडिलांना धमकीचे फोन येत आहेत. माझ्या वडिलांना तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या फोनवरुन दिल्या जात आहेत,’ असं सार्थक सांगतो.

मोदींना लिहीलेल्या पत्रामध्ये त्याने लोकसभा निवडणुकीमधील विजयासाठी मोदींचे अभिनंदन केले आहे. आपल्या पत्रात तो म्हणतो, ‘मोदी है तो मुमकीन है ही घोषणा मी ऐकली आहे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की माझी तक्रार एकदा ऐका.’ वडिलांना चुकीच्या पद्धतीने फसवणाऱ्यांवर कारवाई करुन आम्हाला न्याय मिळवून द्या असं सार्थकने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे मागील तीस वर्षांपासून पत्र व्यवहार करणाऱ्या शहीद सैनिकाच्या पत्नीला संरक्षण मंत्रालयाने मदत केली होती. ३० वर्षांपासून पेन्शनच्या पैशांसाठी संरक्षण मंत्रालयाशी पत्र व्यवहार करणाऱ्या या महिलेल्या वयाच्या ९४ व्या वर्षी मदत मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाने या महिलेला पेन्शन म्हणून ७५ लाख रुपये आणि त्यावरील २९ वर्षांचे व्याज अशी एकूण एक कोटीहून अधिकची रक्कम देण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत. अशाचप्रकारे आपलीही विनंती एक दिवस मोदी नक्की ऐकतील अशी आशा सार्थकला आहे.