पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ शनिवारी दहशतवादविरोधी न्यायालयात हजर झाले असता त्यांची १४ दिवसांसाठी म्हणजेच ४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र मुशर्रफ यांच्या फार्महाऊसला उपकारागृहाचा दर्जा देण्यात आला असल्याने त्यांना प्रत्यक्ष कारागृहाऐवजी त्यांच्याच फार्महाऊसवर ठेवण्यात येणार आहे.
मुशर्रफ यांनी पोलीस मुख्यालयात शुक्रवारची रात्र घालविली. त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयात त्यांना आणण्यात आले. न्या. कौसर अब्बास झैदी यांच्यासमोर हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मुशर्रफ न्यायालयात आले असता तेथील वकिलांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा मुशर्रफ यांचे समर्थक आणि वकिलांमध्ये झटापट झाली. न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांना सलाम केला. त्यांच्याजवळ कोणालाही जाण्याची मुभा देण्यात आली नाही.