भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण १४ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामुळे संरक्षण, अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढवणार असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.
मेक इन इंडियातंर्गत संरक्षण क्षेत्रात फ्रान्सच्या गुंतवणूकीचे आम्ही स्वागत करतो असे सांगताना मोदी म्हणाले, भारत आणि फ्रान्सची रणनितीक भागीदारी २० वर्ष जुनी आहे. पण दोन्ही देशांच्या अध्यात्मिक भागीदारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. येत्या काळात शांतता आणि समृद्धतेमध्ये हिंद महासागराचे क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दहशतवाद आणि कट्टरपंथीयांविरोधात आम्ही एकत्र लढणार आहोत असे आश्वासन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बैठकीदरम्यान दिले. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन यांचे शुक्रवारी रात्री दिल्लीत आगमन झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. मॅक्रॉन १२ मार्चपर्यंत भारतात आहेत. शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 5:12 pm