काद्रीच्या फाशीचा बदला घेण्याचा प्रयत्न

वायव्य पाकिस्तानातील शहरात आत्मघाती बॉम्बस्फोटात दोन पोलिसांसह १४  ठार, तर २६ जण जखमी झाले आहेत. खैबर पख्तुनवा प्रांतात महंमद या संवेदनशील भागात शबाकदर या सीमावर्ती भागातील कनिष्ठ न्यायालयात हा स्फोट झाला. पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांच्या हत्याप्रकरणी त्यांचा अंगरक्षक असलेल्या मुमताझ काद्री याला मंगळवारी रावळपिंडी तुरुंगात फाशी देण्यात आले होते, त्याचा सूड घेण्यासाठी इस्लामी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी सोहेल खालीद यांनी दिली.

तासीर हे सुधारणावादी असल्यामुळे काद्री याने २०११ मध्ये त्यांची हत्या केली होती. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या जमातुल अहरर या गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पोलिसांनी सांगितले, की चारसड्डा जिल्हय़ात आत्मघाती हल्लेखोर न्यायालयाच्या आवारात आला व स्फोट केला. त्यात एका पोलिसासह आठ जण ठार झाले तर इतर पंधरा जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले, की आत्मघाती हल्लेखोराला अडवण्यात आले होते, पण तरी तो न्यायालयाच्या आवारात घुसला व त्याने शरीराला बांधलेल्या स्फोटकांचा जोरदार स्फोट करून विध्वंस घडवला.

मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आवारात अनेक लोक उपस्थित असताना हा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दले व पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा कडे केले असून चौकशी चालू आहे.