राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूमधून अटक केलेल्या १४ जणांनी भारतात इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेचं केंद्र उभारण्यासाठी दुबईत निधी जमा केली होता अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. या सर्वांनी अल-कायदा या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिला होता. तसंच येमेनमधील दहशतवादी संघटनेशी त्यांचे संबंध होते अशी माहिती एनआयएच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

संयुक्त अरब अमिरातीने (युएई) या १४ जणांचं गेल्या आठवड्यात भारतात प्रत्यार्पण केलं. त्याआधी सहा महिने त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं होतं. सोमवारी एनआयएने चौघांना चेन्नईला नेलं असता त्यांना २५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण चांगले नोकरी करणारे असून युएईमध्ये वास्तव्य करत होते. यामधील एकजण तर गेल्या ३२ वर्षांपासून दुबईत राहत होता.

“त्यांनी जाणीवपूर्वक दहशतवादी हल्ल्यासाठी निधी गोळा केला. भारतीय सरकारविरोधात युद्ध पुकारण्यासाठी इस्लामिक स्टेटची शाखा भारतात सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न होता”, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली आहे. चौकशीनंतर एनआयएने हरिश मोहम्मद आणि हसन अली या दोघांना अटक केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन अली हा इस्लामिक स्टेटचा ऑपरेटिव्ह असून भारतावर हल्ला करण्यासाठी तरुणांची भरती करत होता.

त्याने काही व्हिडीओही पोस्ट केले होते. या व्हिडीओतून त्याने वाहनांचा शस्त्र म्हणून वापर करत किंवा स्फोटकं, विष यांचा वापर करत हल्ला करण्याचं समर्थकांना आवाहन केलं होतं. एनआयए गेल्या काही महिन्यांपासून इस्लामिक स्टेटच्या वेगवेगळ्या ग्रुपवर कारवाई करत आहे. श्रीलंका हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोराशी संबंध असलेल्या पाच जणांना कोईम्बतूर येथून अटक करण्यात आली होती.