‘जागतिक आरोग्य संघटने’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे. या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरं ही केवळ भारतात आहे. यात दिल्ली, मुंबई आणि वाराणसी या शहरांचाही समावेश आहे. या शहरात प्रदूषणाची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई ही चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतलं प्रदूषण हे बिंजिंगपेक्षाही अधिक आहे अशी धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे.

दिल्ली, मुंबई पाठोपाठ कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे. भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास २४ लाख अकाली मृत्यू हे केवळ प्रदूषणामुळे झाले असल्याचीही बाब यात अधोरेखित करण्यात आली आहे. हवेत असलेल्या सल्फेट, नायट्रेट , कार्बन यासारख्या घटकांमुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका पोहोचत आहे. या संघटनेच्या अहवालानुसार १० पैकी ९ जण हे सर्वाधिक प्रदूषकं असलेल्या हवेत श्वास घेत आहेत.

दुर्दैवानं सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतीय शहरांची नाव येण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमधल्या बिजिंग शहरानंतर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत राजधानी दिल्लीचं नाव घेतलं जातं होतं. पण वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे.प्रदूषित शहरांच्या यादीत वाढत चाललेली भारतीय शहरांची नावं ही एक प्रकारे धोक्याची घंटाच आहे. ज्या देशांतील माणसांचं सरासरी आर्थिक उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना नाहीत अशा देशांना प्रदूषणाचा विखाळा बसतोय यात भारतासह आफ्रीका खंडातील देशांचांही समावेश आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार जगातील जवळपास ७० लाख लोकांच्या मृत्यूला वाढतं प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषित हवेत असलेले आरोग्यास घातक कण श्वासावाटे शरीरात जातात. यामुळे श्वसनाच्या विकारांसह, कॅन्सर, हृदयरोग, त्वचारोग असे अनेक आजार संभवतात.