गुजरातच्या सुरत जिल्ह्य़ात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ जणांचा मंगळवारी डम्परखाली चिरडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये राजस्थानातील १३ स्थलांतरित कामगार आणि एक वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये आठ महिला आणि मध्य प्रदेशातील एका स्थलांतरित कामगाराचा समावेश आहे. यापैकी १२ जण जागीच ठार झाले तर अन्य तीन जण रुग्णालयात उपचारांदरम्यान मरण पावले, असे  पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील एक १९ वर्षीय कामगार वगळता अन्य सर्वजण राजस्थानच्या बन्सवारा जिल्ह्य़ातील होते. सुरतपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या कोसंबा गावाजवळ ही दुर्घटना घडली.

उसाने भरलेल्या ट्रकला धडक दिल्यानंतर चालकाचा डम्परवरील ताबा सुटला असे पोलिसांनी सांगितले. डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अपघातामध्ये चालक आणि क्लीनर हेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

किम-मांडवी रस्त्यावर झोपलेल्या स्थलांतरित कामगारांना डम्परने चिरडले, असे सुरतच्या पोलीस अधीक्षिका उषा रादा यांनी सांगितले. अन्य जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.