मध्य प्रदेशातील इंदूर येथे काही दिवसांपूर्वी एका १४ वर्षाच्या मुलाची हातगाडी पालिका कर्मचाऱ्यांनी पलटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पालिका कर्मचाऱ्यांनी १०० रुपयांची लाच न दिल्याने अंड्यांनी भरलेली आपली हातगाडी पलटी केल्याचा आरोप मुलाने की होता. हतबल मुलगा आपला आक्रोश व्यक्त करत असतानाचा व्हिडीओ यावेळी समोर आला होता. ही घटना समोर आल्यानंतर या मुलाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घऱ मिळालं असून मुलाला आणि त्याच्या भावंडांना मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. कुटुंबाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून मदतीसाठी वारंवार संपर्क साधण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पारस रायकर असं या मुलाचं नाव आहे.

१४ वर्षाच्या मुलाकडून १०० रुपयांची लाच देण्यास नकार, पालिका अधिकाऱ्यांनी हातगाडी पलटी करत केली नासधूस

काय झालं होतं ?
२२ जुलै रोजी महापालिका अधिकाऱ्यांनी पारसची अंड्यांनी भरलेली हातगाडी रस्त्यावर पलटी केली होती. आपण १०० रुपयांची लाच देण्यास नकार दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी गाडी पलटी करुन अंड्यांची नासधूस केल्याचा आरोप पारसने केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पारसने केलेल्या दाव्यानुसार, पालिका कर्मचाऱ्यांनी १०० रुपये दे किंवा येथून हातगाडी हटव असं सांगितलं होतं. पण आपण लाच देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी हातगाडी पलटी केली. यामुळे हातगाडीवरील सर्व अंड्यांचं नुकसान झालं.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेत त्याला रोख रक्कम दिली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील पारस आणि त्याच्या भावंडाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबत त्यांनी १० हजारांची मदतही पाठवली आहे.