गाईची हत्या केल्यावर १४ वर्षांची शिक्षा होते. मात्र माणसाची हत्या केल्यावर अवघी दोन वर्षांची शिक्षा होते, असे दिल्लीतील एका न्यायमूर्तींनी एका प्रकरणाचा निकाल देताना म्हटले आहे. हरयाणातील एका उद्योगपतीच्या मुलाने २००८ मध्ये त्याच्या आलिशान गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने उद्योगपतीच्या मुलाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यावेळी बोलताना गाईंची आणि माणसाची हत्या करण्यात आल्यावर सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेवर न्यायाधीशांनी भाष्य केले.

‘गाईंची हत्या केल्यावर काही राज्यांमध्ये पाच वर्षे, काही राज्यांत सात वर्षे, तर काही राज्यांमध्ये तर १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते. मात्र अतिवेगाने गाडी चालवल्याने आणि निष्काळजीपणाने झालेल्या अपघातामुळे एखाद्या माणसाचा जीव गेल्यास अवघ्या दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते,’ असे दिल्लीतील सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव कुमार यांनी म्हटले. हरयाणातील एका उद्योगपतीचा ३० वर्षीय मुलगा उत्सव भासिनला न्यायालयाने बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल आणि निष्काळजीपणामुळे एकाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याबद्दल दोषी धरले. याप्रकरणी मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला १० लाखांची भरपाई देण्याचा आदेशदेखील न्यायालयाने दिला. यासोबतच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला दोन लाखांची भरपाई देण्याच्या सूचना न्यायालयाने केली होती.

११ सप्टेंबर २००८ रोजी बीबीएचा विद्यार्थी असलेला भासिनने दुचाकीवरुन जाणाऱ्या अनुज चौहान आणि त्याचा मित्र मृगांक श्रीवास्तवला धडक दिली. दक्षिण दिल्लीतील मूलचंद येथे हा अपघात झाला. या अपघातात भासिनच्या बीएमडब्ल्यू गाडीखाली आल्याने अनुज चौहानचा मृत्यू झाला, तर अनुज या अपघातातून बचावला. यानंतर चंदिगडला पळून जात असलेल्या भासिनला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. यानंतर शनिवारी या प्रकरणी भासिनला शिक्षा ठोठावण्यात आली. दिल्ली सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता भासिन दिल्ली उच न्यायालयात दाद मागणार आहे.