दक्षिण येमेनमध्ये बंडखोर व हादी यांचे समर्थक यांच्यात जोरदार चकमकी झाल्या असून १४० जण ठार झाले, असे रेड क्रॉसने म्हटले आहे. मानवतावादी तत्त्वावर काम करणाऱ्या रेड क्रॉसला येमेनमध्ये मदतकार्य करण्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
अरेबियन द्वीपकल्पातील एक गरीब देश असलेल्या येमेनवर असेच युद्ध व संघर्ष लादला गेला, तर तेथील परिस्थिती आणखी वाईट होईल असा इशारा रेडक्रॉसने दिला आहे. येमेनमध्ये सध्या सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी व इराण समर्थक हुथी शिया बंडखोर यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. बंडखोर व अध्यक्ष अबेद्राबो मनसौर हादी यांचे समर्थक यांच्यात दक्षिणेकडील अ‍ॅडन शहरात रक्तरंजित संघर्ष झाला. गेल्या चोवीस तासांत जे मृत्युमुखी पडले, त्यात जास्तीत जास्त बंडखोरांचा समावेश आहे. बंडखोरांनी हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. १९ हुथी व १५ हादी समर्थक अ‍ॅडेनच्या उत्तरेला दलेह येथे ठार झाले तर दक्षिणकडील अबयान प्रांतात इतर सात जण ठार झाले. हादी समर्थकांनी अबयानमधील लष्करी छावणीला वेढा दिला असून हे ठिकाण सध्या बंडखोरांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. तेथे हवाई हल्ल्यात दहा बंडखोर ठार झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते हादी हे येमेनचे कायदेशीर प्रमुख असून त्यांनी फेब्रुवारीत हुथी बंडखोरांनी केलेल्या संघर्षांनंतर अ‍ॅडेन येथे आश्रय घेतला. हादी नंतर सौदी अरेबियात पळाले असून बंडखोरांनी त्यादरम्यान दक्षिणेकडे आगेकूच केली. येमेन-सौदी आघाडीतील संघर्षांला तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. येमेन हा देश तेलसंपन्न सौदी अरेबियाच्या सीमेवर असून सागरी मार्गानी वेढलेला आहे.