लोकसभा निवडणूक 2014 मध्ये पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा अर्थ प्रत्येक खासदाराच्या संपत्तीत 13.32 कोटींची वाढ झाली आहे. खासदारांच्या या यादीत भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या, बीजू जनता दलाचच्या खासदार पिनाकी मिश्रा दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकासहित टॉपवर आहेत.

इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. यानुसार 153 खासदारांच्या संपत्तीत प्रत्येक वर्षी (2009 ते 2014) किमान 7.81 कोटींची वाढ झाली. एडीआरने 2014 मध्ये पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांनी दिलेल्या आर्थिक माहितीची तुलना करुन पाहिली असता ही आकडेवारी समोर आली आहे.

पाहणीनुसार, 2009 मध्ये खासदारांची संपत्ती किमान 5.50 कोटी इतकी होती. ही संपत्ती दुपटीने वाढली असून 13.32 कोटी झाली आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वात जलदगतीने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या संपत्तीत 116.73 कोटींची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 15 कोटी होती. हा आकडा 2014 मध्ये 131 कोटींवर पोहोचला.

बीजू जनता दलाच्या खासदार पिनाकी मिश्रा यांच्या संपत्तीत 107 कोटींची वाढ झाली. 2014 मध्ये त्यांची सपंत्ती 137 कोटी झाली. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक असून 2009 मध्ये त्यांची संपत्ती 51 कोटी होती, जी 2014 मध्ये 113 कोटी इतकी झाली.

पक्ष पातळीवर पहायचं झाल्या, 72 भाजपा खासदारांच्या संपत्तीत किमान 7.54 कोटींची वाढ झाली तर काँग्रेसच्या 28 खासदारांच्या संपत्तीत 6.35 कोटींची वाढ झाली. मोठ्या नेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास राहुल गांधी यांची संपत्ती 2009 मध्ये दोन कोटी इतकी होती. 2014 मध्ये ही संपत्ती सात कोटी झाली.