जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास 142 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक आर आर भटनागर यांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप 200 ते 250 दहशतवादी सक्रिय असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

महासंचालक भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016-17 शी तुलना करता काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे. तसंच जवान जखमी होण्याची आकडेवारीही कमी झाली आहे.

तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती होण्यापासून रोखण्यासाठी ‘मददगार’ हेल्पलाइन सुरु करण्यात आली होती. यावर गेल्या एका वर्षात तब्बल अडीच लाख फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दहशतवादी हताश झाल्याने निशस्त्र सुरक्षा जवान आणि त्यांच्या कुटुंबांवर हल्ला करु लागले होते असं त्यांनी सांगितलं आहे.

काश्मीरमधील सुरक्षेबद्दल विचारलं असता महासंचालकांनी सांगितलं की, जिथपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आमच्यासमोर दगडफेक, बंद आणि मोर्चे हे महत्त्वाचे प्रश्न असून ते योग्य पद्धतीने हाताळले जात आहेत.