बांग्लादेशात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४४ जण ठार झाले असून त्यात १०० जण दूरस्थ पर्वतीय प्रदेशात गाडले गेले. भारतीय सीमेला लागूनच ही घटना घडली असून मदतकार्य वेगात सुरू आहे. आग्नेय रंगमती पर्वतीय जिल्ह्य़ात वीस ठिकाणी दरडी कोसळून १०५ जण ठार झाले. त्यात मदतकार्य करणाऱ्या चार जवानांचा समावेश आहे.

बंदरबन व चितगाव हे दोन प्रभावित जिल्हे असून तेथेही मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १२९ जण मरण पावले असले तरी माध्यमांनी मृतांचा आकडा १४४ दिला आहे. गेले तीन दिवस बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाने जोरदार पाऊस झाल्याने दरडी कोसळण्याच्या घटना तीन जिल्ह्य़ात सोमवारी घडल्या. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले, की ४००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराचे पंधरा जवान ३० फूट ढिगाऱ्याखाली गाडले गेले, त्यात चार जागीच ठार झाले त्यात लष्कराचा मेजर व कॅप्टन यांचा समावेश आहे.

मदतीसाठी सैन्याला पाचारण करण्यात आले असून चितगाव व रंगमती यांना जोडणारा रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मृतात आदिवासी गटांच्या अनेकांचा समावेश आहे. चितगाव येथे पाच ठिकाणी दरडी कोसळून ३३ जण ठार झाले आहेत.