पाकिस्तानमध्ये सोमवारी एका सरकारी रूग्णालयात भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३० जण मृत्यूमुखी पडले आहेत. बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहरात हे रूग्णालय आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून या स्फोटाची जबाबदारी स्विकारण्यात आलेली नाही. या स्फोटामध्ये १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर या परिसरात गोळीबार झाल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. स्फोटानंतर हा प्रदेश निर्मनुष्य करत पोलिसांनी रुग्णालयास वेढा घातला आहे. क्‍वेटामधील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणीची परिस्थिती घोषित करण्यात आली असून, स्फोटांमधील जखमींना उपचारार्थ या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.
बलुचिस्तान बार असोसिएशन (बीबीए) या संघटनेचे अध्यक्ष बिलाल अन्वर काजी यांची आज पहाटे अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आल्यानंतर या भागामध्ये काही वकिल रूग्णालयाच्या परिसरात जमले असताना हा स्फोट झाला. क्वेटा ही बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे. तब्बल ५० जण जखमी अवस्थेतील बिलाल यांना घेऊन रूग्णालयाच्या आपातकालीन विभागात आले. तेव्हाच या बॉम्बचा स्फोट झाला, असे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सांगितले. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बिलाल अन्वर काजी रूग्णालयात आल्यानंतर हा स्फोट झाला. सध्या पोलिसांकडून रूग्णालयाचा परिसर खाली करण्यात आला आहे.