पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर-पख्तुनवा प्रांतातील दोन मशिदींमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये किमान १५ जण ठार झाले असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी तालिबान्यांचा बालेकिल्ला असलेल्या मलकंद जिल्ह्य़ातील बाझदरा या दुर्गम भागांत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हे स्फोट घडविण्यात आले.
वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोटात किमान १५ जण ठार झाले असून मशिदींचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे उपायुक्त अमजद अली यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटाची खबर मिळताच सुरक्षारक्षकांनी या परिसराला वेढा घातला असून जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. स्फोटांचे स्वरूप त्वरित कळू शकले नाही.
पाकिस्तानात गेल्या आठवडय़ात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने तालिबान आणि अन्य गटांशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. इम्रान खान यांचा पक्ष अन्य दोन पक्षांच्या पाठिंब्याने येथे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.