सुकमा जिल्ह्य़ातील कारवाई

शिरावर इनाम असलेल्या दोघांसह १५ नक्षलवाद्यांना छत्तीसगडमधील माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुकमा जिल्ह्य़ातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्य़ातच आयईडीच्या स्फोटात भूसुरुंगरोधक वाहन उडवून दिल्याच्या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ९ जवान मरण पावल्यानंतर सुमारे आठ दिवसातच ही अटक झाल्याने तिला महत्त्व आहे.

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचा गेल्या आठवडय़ातील स्फोटात सहभाग नव्हता, मात्र फेब्रुवारीत पोलीस पथकावर हल्ला करून दोन पोलिसांना ठार करण्याच्या घटनेत ते सहभागी होते, असे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान दोन महिलांसह १४ नक्षलवाद्यांना भेज्जी भागातील जंगलातून अटक करण्यात आली, तर एकाला जिल्ह्य़ातील पुषपल भागात पकडण्यात आले, असे पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. विशेष कृती दल (एसटीएफ), जिल्हा राखीव गार्ड, जिल्हा दल आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरीत्या भेज्जीची मोहीम राबवली.

भेज्जी येथून पकडण्यात आलेले सर्व, म्हणजे १४ जण या वर्षी १८ फेब्रुवारीला एलारमाडगु जंगलात एका पोलीस पथकावर करण्यात आलेल्या हल्ल्यात सामील होते. याशिवाय, याच भागात रस्ते बांधकामावरील एका मजुराला ठार करणे आणि बांधकाम साहित्य तसेच वाहनाला आग लावण्यातही त्यांचा सहभाग होता.

ग्राम पटेलची नक्षलवाद्यांकडून हत्या

गावातील विकासकामांना सहकार्य करणाऱ्या दारो हांडा या ३५ वर्षीय ग्राम पटेलाची (ग्राम प्रमुखाशी समकक्ष) छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्य़ांत संशयित नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गावात आणि नजीकच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये हांडा स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत होता. हांडा याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह गुरुवारी सकाळी धुरगुडा गावानजीक सापडला, असे पोलिसांनी सांगितले. सशस्त्र नक्षलवाद्यांच्या एका गटाने बुधवारी रात्री हांडा याच्या घरात घुसून त्याला घराबाहेर खेचत आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नक्षलवाद्यांचे दोन आयईडी हस्तगत

छत्तीसगडच्या बंडखोरीग्रस्त सुकमा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली दोन शक्तिशाली स्फोटक उपकरणे (आयईडी) सुरक्षा दलांनी हस्तगत केली आहेत. सीआरपीएफच्या २१२व्या बटालियनने या भागात बुधवारी शोधमोहीम राबवताना हे आयईडी शोधून काढल्याचे आके पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवडय़ात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असताना ही घडामोड झाली आहे.

अनुक्रमे सात व आठ किलोग्रॅम वजनाचे हे आयईडी कंसाराम नाल्याखालील धुळीच्या रस्त्यावर पेरलेले आढळले. किस्तराम व पालोडी खेडय़ांदरम्यान १३ मार्चला नक्षलवाद्यांनी ज्या ठिकाणी आयईडीचा स्फोट घडवून नऊ जवानांना ठार मारले होते, तेथून ही जागा काही मीटर अंतरावर आहे. बॉम्बनाशक पथकाने त्वरित ही स्फोटके निकामी केली.