देश करोनाच्या संकटाला तोंड देत असताना पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तो भारतीय लष्करानं हाणून पाडला. त्यानंतर २०० दहशतवादी सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. या माहितीच्या आधारे लष्करानं थेट केरन सेक्टरमधील सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात १५ पाकिस्तानी सैनिकांसह ८ दहशतवादी जागीच ठार झाले. हिंदुस्थान टाइम्सनं लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी तीन दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील होते. तर इतर दोन जैश ए मोहम्मदमध्ये प्रशिक्षण घेतलेले होते. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पाकिस्तान लष्करानंही या घटनेला दुजोरा दिला आहे. भारतीय लष्करानं शारदा, दूधनील, शाहकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला. मात्र, यात चार नागरिक ठार झाले आहेत. ज्यात एका १५ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, असं पाकिस्तानी लष्करानं म्हटलं आहे. भारतीय लष्करानं २०२० या चालू वर्षात ७०८ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याचा कांगावा पाकने केला आहे.

दरम्यान गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, १० एप्रिल रोजी भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत ८ दहशतवाद्यांसह १५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यात आला. यात दूधनीलमधील किराणा मालाच्या दुकानांचही नुकसान झालं, असं या अहवालात म्हटलं आहे. राजौरीतील पीर पांजल आणि जम्मू सेक्टरमधील परिस्थितीही केरन सेक्टर सारखीच आहे. या सेक्टरमध्ये सीमेपलीकडून ७० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रतिक्षेत आहेत, गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.