म्हशीनं शेतातील पिकाची नासाडी केल्याचा राग मनात धरून तीन जणांनी १५ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्या तिघांविरोधात सिंधौली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपुर जिल्ह्यातील सिसैया गावातील १५ वर्षीय कुलदीप यादव म्हैस राखत राखत आपल्या मित्रासोबत खेळत होता. कुलदीप मित्रासोबत खेळण्यात गुंग झाला होता त्यावेळी म्हैस अचानक शेजारी असलेल्या साधू सिंग आणि धर्मेंद्र सिंग यांच्या शेतात गेली. साधू सिंग आणि धर्मेंद्र सिंग यांनी म्हशीला पकडले आणि माघारी देण्यास नकार दिला. त्यावेळी कुलदीप आणि त्यांच्या शाब्दिक चकमक झाली.

पिकाची नासाडी झाली आहे म्हैस देणार नाही, असं दोन्ही भावाचे मत होते. यातूनच साधू सिंग आणि धर्मेंद्र सिंग तसेच भूपेंद्र सिंग (धर्मेंद्र सिंह यांचा मुलगा) या तिंघानी कुलदीपला लाथा बुक्या आणि काठीनं मारायला सुरूवात केली. खूपवेळ मारहाण केल्यामुळे कुलदीपगंभीर जखमी झाला अन् घटनास्थळावरच बेशुद्ध पडला. कुलदीपचे वडील महेश यादव यांनी त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण रविवारी उपचारादरम्यानचा कुलदीपचा मृत्यू झाला. पोलिसांनी साधू सिंग, धर्मेंद्र सिंग आणि भूपेंद्र सिंग यांच्याविरोधात कलम ३२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.