10 December 2018

News Flash

धक्कादायक! पुजाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या!

दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती मुलगी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एका मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पुजाऱ्याच्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह मेरठ या ठिकाणी आढळला. या मुलीच्या मृतदेहावर सिगारेटच्या चटक्यांचे डाग आहेत. तसेच इतरही जखमा आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून ही मुलगी बेपत्ता होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

२७ डिसेंबरपासून ही मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी या संदर्भातली तक्रार मोदीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतरही पोलिसांनी तिला शोधण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. ज्या मुलांनी माझ्या मुलीचे अपहरण केले त्यापैकी एकाचा मोबाइल नंबरही मी पोलिसांना दिला होता. मात्र पोलिसांनी त्या नराधमांना शोधण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, असाही आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला.

२६ डिसेंबरला माझ्या मुलीला तिची आई रागावली होती. तिच्याजवळ तिच्या आईला एक मोबाईल फोन मिळाला होता जो तिला आम्ही घेऊन दिला नव्हता. त्याच मोबाइलवरून आई आणि मुलीचा वाद झाला होता. त्यानंतर ही मुलगी घराबाहेर पडली. आम्ही तिला शोधले पण ती सापडली नाही असेही टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे. मेरठ पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हे सगळे प्रकरण नेमके काय आहे? मुलीला पळवून नेणारे ते नराधम कोण होते? या मुलीची इतक्या क्रूरपणे हत्या का करण्यात आली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीत आहेत. या सगळ्याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातो आहे.  या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी काही पथके तयार केली असून लवकरच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना गजाआड करू असेही आश्वासन पोलिसांनी दिले.

 

 

First Published on January 14, 2018 12:09 pm

Web Title: 15 year old girl abducted from ghaziabad raped and killed in meerut
टॅग Girl Raped